बंद

    परिचय

    महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 अन्वये धाराशिव जिल्हा परिषद 1 मे, 1962 रोजी अस्तित्वात आली. 26 सप्टेंबर, 1980 रोजी शासनाने धाराशिव जिल्हा परिषद व तिच्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्या विसर्जित करून प्रशासकांची नियुक्ती केलेली होती. 15 ऑगष्ट, 1982 रोजी धाराशिव  जिल्हयाचे विभाजन होऊन धाराशिव व लातूर असे दोन जिल्हे निर्माण करण्यात येऊन दोन्ही जिल्हा परिषदांवर प्रशासकांची नियुक्ती केली होती. लोक नियुक्त प्रतिनिधी जिल्हा परिषदेचा दिनांक 21 मार्च, 1992 पासून कारभार पहात आहेत. जिल्हा परिषदे खेरीज स्थायी समिती धरून एकूण 10 विषय समित्या मार्फत कारभार चालविण्यात येत होता. सध्या दिनांक 20.03.2022 रोजी जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे महाराष्ट्र शासन अधिसूचना दिनांक 11.03.2022 अन्वये दिनांक 21.03.2022 पासून मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

    महाराष्ट्र शासन, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अधिसूचना क्रमांक पीएसई-10-2000/सीआर-74 (31) ते (35)-05, दिनांक 12-11-2001 अन्वये महाराष्ट्र शासनाने धाराशिव  जिल्हातील परंडा, भूम व कळंब या गटाचे विभाजन करून नवीन वाशी या गटाची तसेच धाराशिव जिल्हातील उमरगा व तुळजापूर या गटाचे विभाजन करून नवीन लोहारा या गटाची रचना करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, 1961 अन्वये नवनिर्मित पंचायत समिती, लोहारा व वाशी दिनांक 11-12-2001 पासून अस्तित्वात आलेली आहे. धाराशिव जिल्हयात धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, परंडा, कळंब, भूम व वाशी असे एकूण आठ तालुके असून या जिल्हा परिषदेच्या अधिकार क्षेत्रात धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, परंडा, कळंब, भूम व वाशी अशा एकूण 8 पंचायत समित्या कार्यरत आहेत. या जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात एकूण 622 ग्राम पंचायती आहेत.

    भौगोलिक रचना

    धाराशिव जिल्हयाची 2011 च्या जनगणने प्रमाणे एकूण लोकसंख्या 16,57,576 व क्षेत्रफळ 7,569 चौ.कि.मी. आहे. ग्रामीण विभागाचे क्षेत्र 7,439.99 चौ.कि.मी. व शहरी विभागाचे क्षेत्र 129.01 चौ.कि.मी. आहे.

    धाराशिव जिल्हा बालाघाट पर्वतांच्या रागांनी व्यापलेला असून भूम, वाशी, कळंब, धाराशिव व तुळजापूर हे तालुके या रांगेत येतात. उर्वरित उमरगा, लोहारा व परंडा हे तालुके पठारावर वसलेले आहेत.

    या जिल्हयातील मांजरा, तेरणा व सीना या प्रमुख नद्या आहेत. समुद्र सपाटी पासून या जिल्हयाची सरासरी उंची 2,000 फूट आहे. जिल्हयात भूम तालूका समुद्र सपाटी पासून सर्वात उंचीवर म्हणजे 2,500 फूट उंचीवर आहे व परंडा तालुका सर्वात कमी उंचीवर म्हणजे 1,735 फूट उंचीवर आहे.

    हवामान व पर्जन्य

    धाराशिव जिल्हा कोरडया हवामानाचा आहे. सर्व साधारणपणे जून ते सप्टेंबर पर्यंत पावसाळा असतो. पावसाचे सरासरी प्रमाण कमी असून उमरगा तालुका आणि धाराशिव तालुक्याचे तेर मंडळ व कळंब तालुक्याचे शिराढोण मंडळ वगळता इतर भाग अवर्षण प्रवण क्षेत्र आहे.

    ऐतिहासिक

    या जिल्हयात तुळजापूर, अणदूर, तेर, रामलिंग, सोनारी व कुंथलगिरी ही ठिकाणे प्रसिध्द तीर्थ क्षेत्रे आहेत. परंडा व नळदूर्ग येथे प्राचीन व प्रेक्षणीय किल्ले आहेत. जिल्हयात तेरणा, बोरी, खासापूरी, चांदणी तसेच रामगंगा व बाणगंगा हे प्रमुख पाटबंधारे प्रकल्प आहेत.